बुलडाणा : - भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाच्या धडकेत स्कुटीस्वार युवतीचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली. हा हृदयद्रावक अपघात बुलडाणा-चिखली राज्य मार्गावरील त्रीशरण चौकात सायंकाळी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल संदीप चौधरी (वय २४) आणि तिची आई छाया संदीप चौधरी (वय ५५) स्कुटीवरून चिखली मार्गे डाक विभाग कार्यालयाकडे जात होत्या. दरम्यान, मागून भरधाव आलेल्या महिंद्रा पीकअप मालवाहू वाहन ने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. अपघातात स्नेहलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर छाया चौधरीही गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघींनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाला, तर तिची आई अद्यापही गंभीर अवस्थेत आहे. मूळच्या साखळी गावच्या चौधरी कुटुंबाचा सध्या बुलडाणा शहरातील चांडक ले-आऊट येथे निवास आहे. अपघाताची माहिती मिळताच स्नेहलचे वडील संदीप चौधरी, जे जिल्हा परिषदेत कनिष्ठ लेखाधिकारी आहेत, यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी मालवाहू वाहन चालक संतोष भास्कर बाहेकर (वय २३, रा. किन्होळा, ता. चिखली) याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
भरधाव मालवाहू वाहनाची स्कुटीला धडक; स्कुटीस्वार युवती ठार, आई गंभीर जखमी, बुलढाणा येथील घटना !
पंकज मोरे ( मुख्य संपादक )
0
टिप्पणी पोस्ट करा