जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये सिद्धेश्वर नगरात रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवर गाण्याच्या वादातून दगडफेक झाली. यामध्ये आठ जण जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ ७ फेब्रुवारी रोजी ९.३० वाजता रमाबाई आंबेडकर जयंतीची मिरवणूक आली. रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि "तू
शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?" असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता काहींनी "बंद करा गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो," असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली.
या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तीचे नुकसान झाले. या घटनेत अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडू जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी बाच आणि आशिष भालेराव हे जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आशाबाई कैलास बिऱ्हाडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर १० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. ०१८/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १८९(१), १८९(३), १८९(३), १८९ (४), ११८(१), २९९ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा