जालन्यात एका तरुणाची जाळून हत्या; गावात खळबळ

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात एका २१ वर्षीय तरुणाला जाळून मारल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे. अशी प्राथमिक माहिती मिळतेय. मयत तरुणाचे नाव आकाश बबनराव जाधव (वय २१ वर्ष, रा. मेहुणा, ता. बदनापूर, जि. जालना) असे आहे. ही घटना गावात खळबळ उडवणारी ठरली असून, पोलिस तपास सुरु झाला आहे.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार आकाश नेहमी प्रमाणे काल रात्री घरा बाहेर झोपण्यासाठी गेला होता. आज सकाळी त्याचे वडील बबनराव जाधव हे त्याला उठवण्यासाठी गेले असता, आकाश त्याच्या झोपण्याच्या जागेवर नव्हता. त्यामुळे चिंतेत पडलेल्या त्याच्या वडिलांनी शेजारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने आकाशचा शोध घेतला. सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात आकाशचा जळालेला मृतदेह आढळून आला.
या घटनेने गावात एकच खळबळ माजली असून, आकाशची हत्या कोण आणि कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. तसेच, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे. मयत आकाश जाधवचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आकाशच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील आरोपीस लवकरात लवकर शोधून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने