मुक्ताईनगर :- तालुक्यातील पूर्णाड फाट्यानजीक दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त डंपरला पेटवून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, मातापुर (ता. डोईफोडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) येथील नितेश जगतसिंग चव्हाण (वय ३२), सुनिता नितेश चव्हाण (वय २५) आणि त्यांचा मुलगा शिव (वय ७) हे तिघे
दुचाकीवरून इच्छापूर येथील देवीच्या दर्शनासाठी जात असताना पूर्णाड फाट्यावर वाळूने भरलेल्या डंपरने (क्र. एमएच-१९ सीएक्स-२०३८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी सुमारे ५० ते ६० फूट फरफटत गेली आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर नितेश यांचा दुसरा मुलगा नेहालसिंग (वय ११) गंभीर जखमी असून त्याला तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. त्यांनी डंपर चालकावर मद्यपान करून वाहन चालवल्याचा आरोप करत वाहनाची तोडफोड केली आणि डंपरला
पेटवून दिले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही. या अपघातामुळे मुक्ताईनगर परिसरात शोककळा पसरली असून अपघातग्रस्तांचे मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा