दसरखेड एमआयडीसीत स्कूलबस मधून गुटखा वाहतूक; पोलिसांची धडाकेबाज कारवाई
दसरखेड (ता. मलकापूर) – दसरखेड एमआयडीसी परिसरात काल रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान स्कूलबसच्या स्वरूपात गुटखा वाहतूक करणारी एक नवी बस पोलिसांनी रंगेहाथ पकडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूलबस मुक्ताईनगरकडून मलकापूरच्या दिशेने जात असताना संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले.
चिखलीजवळ या बसच्या वाहनचालकाचा एका दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे वाहन काही वेळ दसरखेड पोलीस स्टेशनसमोर थांबले. बसच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासणी सुरू केली.
तपासणीदरम्यान या स्कूलबस मधून अंदाजे आठ ते साडेआठ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी बससह संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला असून गुटखा कुठून आणला जात होता आणि कुठे पुरवठा होणार होता याचा तपास सुरू आहे.
संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास दसरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेदोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्करीला मोठा आघात बसला असून पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा