मलकापूर :- दिनांक २१/०१/२०२६ दिनांक २५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात-राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोदंणी करुन घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा २५ जानेवारी, २०२६ रोजी १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस २१- मलकापूर विधानसभा मतदार संघांतील सर्व मतदान केंद्र, शाळा महाविदयालये तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी " माय इंडिया माय वोट" हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे.
२१- मलकापूर विधानसभा मतदार संघातील सर्व शाळा महाविदयालयांनी आपले शाळा महाविदयालयातील मतदार साक्षरता मंच सक्रीय करुन २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत मतदार जागरुकता करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुखांनी आपले कार्यालयातील "मतदार जागरुकता मंच" सक्रीय करुन, मतदार जागरुकता करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा मतदार यादीतील मयत, दुबार मतदारांची नावे कमी करुन तसेच मतदारांचे मतदारयादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करुन मतदार यादी १०० टक्के शुध्द करण्यासाठी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक मतदाराची पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन भेट देणार आहेत व प्रत्येक मतदाराकडून गणना प्रपत्र भरुन घेणार आहेत. याकरीता प्रत्येक मतदारास सन २००२ च्या मतदार यादीतील आपले किंवा आपले वडिल/आई/आजोबा/आजी यांचे नावाची आवश्यकता भासणार आहे. तसेच दोन पासपोर्ट आकाराचे अदयावत रंगीत छायाचित्र व आयोगाने निर्धारीत केलेल्या १३ कागदपत्रांपैकी जन्मतारखेनुसार कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. सदयस्थितीत पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दिनांक २९/१०/२०२४ च्या मतदार यादीचे सन २००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंगचे काम करीत आहेत. याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मोबाईलव्दारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून मतदारांकडून सन २००२ च्या यादीबाबत माहिती गोळा करण्याबाबत तसेच मतदार यादीतील मतदारांचे फोटो, नाव, वय, लिंग याबाबतच्या दुरुस्तीकरीता सूचीत करण्यात आलेले आहे. त्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) मतदारांशी संपर्क करीत आहेत. तरी २१-मलकापूर विधानसभा मतदार संघातील (मलकापूर व नांदुरा तालुक्यातील) मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांना सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी, मलकापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१-मलकापूर विधानसभा मतदार संघ, मलकापूर यांनी मतदारांना केले आहे.
सन २००२ च्या मतदार यादीतील आपले किंवा आपले वडिल/आई/आजोबा/आजी यांची नावे शोधण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ या वेबसाईवरील "एसआयआर २००२" या टॅबवर किंवा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/searchInSIR या वेबसाईटवर जाऊन "सर्च युवर नेम इन लास्ट एसआयआर" या टॅबवर क्लिक करुन शोधता येईल. तरी मतदारांनी आपले किंवा आपले वडिल/आई/आजोबा/आजी यांचे सन २००२ च्या मतदार यादीतील आपले नार्दा शोधून ते आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे देण्याचेसुध्दा आवाहन केले आहे.
२१/२०२६ उपविभागीय अधिकारी मलकापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी, २१-मलकापूर वि.स.म.सं., मलकापूर
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा