मलकापूर :- मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगारांची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भाजपा पदाधिकारी अरविंद मनोहर किनगे यांच्याविरोधात तक्रारींचा आकडा वाध्त असून आतापर्यंत तीन जणांनी पोलीसांकडे धाव घेतली आहे. या तिन्ही प्रकरणांत तब्बल ११ लाख ९८ हजार ०४० रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
'नोकरी पक्की' म्हणत लाखोंची उकळपट्टी
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, किनगे यांनी राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचा दावा करत कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. एका तक्रारदाराकडून ३.८२ लाख रुपये तर उर्वरित दोघांकडून प्रत्येकी ४.०७ लाख रुपये फोन पे व आरटीजीएसद्वारे घेतल्याचे समोर आले आहे.
'आमदार-संस्थाध्यक्षांना पैसे द्यावे लागतात' तक्रारीतील धक्कादायक दावा या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, आरोपीने पैसे घेताना 'हे पैसे स्थानिक आमदार व बाजार समिती सभापती यांना द्यावे लागतील, त्याशिवाय काम होणार नाही' असा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची चुप्पी संशय वाढवणारी ठरत असल्याची चचर्चा शहरात रंगली आहे.
पैसे दिल्यानंतर धमक्या फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत मागणाऱ्या तरुणांना आरोपीकडून उलट धमक्या दिल्या गेल्याचा आरोप आहे. 'फोन करू नका', 'खोट्या गुन्ह्यात अडकवीन 'महिला आयोगात तक्रार करीन, गुंडांकडून नुकसान करून घेईन' अशा धमक्यांमुळे पीडित तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उसनवारा, दागिने विकून दिले
आशेने पीडितांनी घरची परिस्थिती बेताची असतानाही उसनवारी केली, दागिने विकले, जमापुंजी दिली. पण आता ना नोकरी, ना पैसे -अशा दुहेरी फसवणुकीला ते बळी पडले आहेत. आणखी किती जण बळी? सध्या फक्त तीन तक्रारी समोर आल्या असल्या तरी, अजून किती जणांकडून पैसे उकळले? फसवणुकीची साखळी किती मोठी आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांकडे सर्वांचे लक्ष या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या असून, आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते? आरोपीवर गुन्हा दाखल होणार का? याकडे संपूर्ण मलकापूरचे लक्ष लागले आहे. निष्कर्ष नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची लुबाडणूक करणाऱ्या या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली असून, राजकीय नावांचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा