मलकापूर :- राज्य शासनाच्या आपले सरकार' पोर्टल बंद असल्यामुळे गत दोन दिवसांपासून राज्यभरातील महा-ई सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प झाले आहे. शैक्षणिक व इतर दाखल्यांची कामे रखडली असली तरी सर्वाधिक संताप दैनंदिन स्वरूपात आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे (अॅफिडेव्हिट) वेळेत उपलब्ध होत नसल्याने व्यक्त होत असून, नागरिकांचा रोष थेट महा-ई सेवा केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे.
सोमवार रात्रीपासून पोर्टल लॉगिन होत नसल्याने उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर, इंडब्ल्यूएससह विविध दाखल्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी राज्यभरातील हजारो अर्ज प्रलंबित पडले असून महा ई सेवा केंद्रांवर प्रकरणांचा ढीग साचत आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. अशा वेळी शैक्षणिक प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक विद्याथ्यांचे अर्ज आवश्यक दाखल्याअभावी अपूर्ण राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
मात्र या सर्वांपेक्षा दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांचा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे. बँकिंग, न्यायालयीन, मालमत्ता, शैक्षणिक तसेच इतर
अनेक कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे पूर्वी एका दिवसात उपलब्ध होत होती. सध्या पोर्टल बंद असल्याने त्यांचे ऑनलाइन अपलोड व प्रक्रिया होत नसल्यामुळे ही कामे दोन दिवसापासून प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून त्याचा थेट परिणाम सेवा केंद्र चालकांवर होत आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि वारंबार चौकशीमुळे केंद्र चालकांनाही मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे. 'पोर्टल बंद असल्याने आम्ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही, तांत्रिक बिघाड आमच्या हातात नसतानाही नागरिकांचा रोष आम्हालाच सहन करावा लागत आहे, अशी व्यथा अनेक महा-ई सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केली.
राज्य शासनाने डिजिटल सेवांचा मोठा गाजावाजा करीत नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मुख्य पोर्टलच कोणतीही पूर्वकल्पना अथवा सूचना न देता अचानक ठप्प झाल्याने या संपूर्ण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत असली तरी कामकाज ठप्प असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. वेळेत दाखले व प्रतिज्ञापत्र न मिळाल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि अन्य सवलतींपासून वंचित राहू शकतात, तर सामान्य नागरिकांची अनेक दैनंदिन कामे रखडत आहेत. त्यामुळे प्रशासनान तात्पुरती मलमपट्टी न करत सर्व्हर क्षमता वाढवून आणि तांत्रिक त्रुटी दूर करून पोर्टल युद्धपातळीवर पूर्ववत सुरू करावे अशी मागणी राज्यभरातून जोम धरत आहे. 'आपले सरकार' पोर्टल लवकर सुरू न झाल्यास महा-ई सेवा केंद्रांवरील कामाच ताण आणि नागरिकांची नाराजी आणखी वाढण्याची शक्यत व्यक्त होत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा