मोताळा : - (पीपल्स टाईम्स वृत्तसेवा) सारोळा मारोती शिवारात सोमवारी (७एप्रिल) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. भरत हरी सुरोशे यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून सात शेळ्या फस्त केल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. सुरोशे यांनी आपल्या गट क्रमांक ११७ मधील शेतात टिनशेडचा गोठा तयार करून शेळ्या ठेवलेल्या होत्या. मध्यरात्री सुमारे १२ वाजता बिबट्याने तारेच्या कुंपणातून प्रवेश करत थेट गोठ्यात हल्ला चढवला. सकाळी गोठ्यातील हालचाल नसल्याने पाहणी केली असता, मृत शेळ्या आणि रक्ताने माखलेला परिसर पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला. ही माहिती मिळताच वनविभागाचे रोहीणखेड बीटचे वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक आर. बी. शिरसाट आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, जानेवारीपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. आतापर्यंत १३ शेळ्या आणि ३ कुत्र्यांचा बळी बिबट्याने घेतला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा