भरधाव टिप्परची मोटरसायकलला धडक; दोन चिमुकल्यांचा जागीच * मृत्यू, संतप्त नागरिकांनी टिप्परला पेटवले !


खामगाव :- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवलेल्या टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन निष्पाप बालकांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना माऊली फाटा, भेंडवळ (ता. खामगाव) परिसरात गुरुवारी (दि. ९) घडली. या अपघातात आजी-आजोबा गंभीर जखमी झाले असून, घटनास्थळी संतप्त जमावाने टिप्परला आगीच्या भक्ष्यस्थानी केले. मिळालेल्या माहितीनुसार, पळशी सुपो (ता. जळगाव जामोद) येथील प्रकाश महादेव खेडकर व त्यांची पत्नी साधना खेडकर हे आपल्या दोन नातवंडांसह पार्थ चोपडे (६, रा. राजापेठ,अमरावती) आणि युवराज मोहन भागवत (५, रा. बडनेरा)
शेगावकडे मोटरसायकलने जात होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास
माऊली फाट्यानजीक मागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक
एवढी भीषण होती की, दोन्ही बालके जागीच ठार झाली, तर आजी व आजोबा
गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून
निष्पाप जीवांवर काळाचा घाला आला. अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी
टिप्परला घटनास्थळीच पेटवून दिले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने जळगाव जामोद पोलिस तातडीने घटनास्थळी
दाखल झाले. खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोहा यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून,
भारी वाहन चालकांच्या बेफिकीर आणि निष्काळजी वाहन चालवण्यावर कठोर
कारवाईची मागणी होत आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने