भ्रातृमंडळ ८ लाख १२ हजार ५०० तर मराठा मंगल कार्यालय २४ लाख ५३ हजार १२५ रू. दंड !

मलकापूर : राष्ट्रीय हरीत लवाद पुणे यांनी आदेश दिल्यानंतरही परवानगी न घेता विना परवानगी कार्यालये चालविल्याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवाद यांनी स्थानिक मराठा मंगल कार्यालय यांना २४ लाख ५३ हजार १२५ रू. व भ्रातृमंडळ यांना ८ लाख १२ हजार ५०० रू. दंड ठोठावला असल्याची माहिती तक्रारकर्ते डॉ. प्रशांत पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील भ्रातृमंडळ, मराठा मंगल कार्यालय व लॉयन्स क्लब (हॉल) या तिघांविरूध्द येथील डॉ. प्रशांत दत्तात्रय पाटील यांनी राष्ट्रीय हरीत लवाद पुणे यांच्याकडे विविध ध्वनी प्रदुषणाबाबतच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत लवादाने ११ ऑगस्ट २०२३ रोजी भ्रातृमंडळ, मराठा मंगल कार्यालय, लॉयन्स क्लब (हॉल) यांना प्रत्येकी ३८ लाख ९८ हजार ४३८ रूपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाविरुध्द तिन्ही कार्यालयाच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाद मागितली होती. यामध्ये नागपूर उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतरही भ्रातृमंडळ व मराठा मंगल कार्यालय यांनी राष्ट्रीय हरीत लवाद पुणे यांचे आदेश असतांनाही परवानगी न घेता विना परवानगी कार्यालये चालविल्याची तक्रार पुन्हा डॉ. प्रशांत पाटील यांनी केली

याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादचे मुख्य न्यायाधिश दिनेशकुमार सिंग व न्यायीक सदस्य डॉ. विजय कुळकर्णी यांनी दोन्ही वादी प्रतिवादींचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर भ्रातृमंडळ यांना ८ लाख १२
हजार ५०० रू. तर मराठा मंगल कार्यालयाला २४ लाख ५३ हजार १२५ रू. एवढा दंड ठोठावला आहे. ही रक्कम १ महिन्याच्या आत भरण्याचेही आदेश देण्यात हरीत लवाद पुणे यांनी दिलेल्या निर्णयात नमूद केले आहेत.

यामध्ये भ्रातृमंडळाच्या वतीने अॅड. कौशिक कुळकर्णी, मलकापूर नगर परिषदेच्या वतीने अॅड. विलास महाजन, पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या वतीने अॅड. विलास जाधव तर अर्जदार / तक्रारदार यांच्यातर्फे स्वतः डॉ. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

दोन्ही कार्यालयांना ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्याच भागातल्या प्रदुषण मुक्ती व अन्य कामांसाठी वापरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने