सामूहिक मारहाणीत तरुणाच्या मृत्यूने जामनेर तालुक्यात दहशत ....!


जामनेर :-  दिनांक 11 ऑगस्ट रोजी जामनेर येथे एका कॅफेमध्ये काही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी
बसले असताना तरुणांमध्ये आपसात झालेल्या भानगडीमुळे जामनेर तालुक्यात बेटावद खुर्द येथील सुलेमान खान रहीम खान या 21 वर्षीय तरुणाला दहा-
बारा तरुणांनी मारहाण केली. त्यानंतर कॅफेमधून त्याला बाहेर काढून अमानुष अशी मारहाण केली. तसेच जखमी
अवस्थेत त्याला एका कारमध्ये टाकून बेटावद या त्याच्या घरासमोर टाकण्यात आले. त्याचे आई-वडील बहीण
विचारपूस करायला लागले तर त्यांनाही या तरुण टोळक्याने मारहाण केली. जखमी अवस्थेत असलेल्या सुलेमान खानला रुग्णालयात उपचारासाठी नेले
असतात तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही बातमी वाऱ्यासारखी जामनेर तालुक्यासह जिल्हाभरात पसरली मारहाण करण्याचे कारण अद्याप कळले नाही. तथापि पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. काही संशयित आरोपींना पकडले आहे. इतर आठ जणांचा
शोधात पोलीस पथके निघाली आहेत. मारहाणीचे कारण अद्याप कळले नसले, तरी मयत तरुणाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. अगदी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांना जशी अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली, त्याची आठवण
करणारी ही अमानुष मारहाण होती, असे मयताचे जवळचे नातेवाईक आरोप करत आहेत. सदर तरुणाचा मृतदेहाची अंत्यविधी करण्यास नातेवाईक तयार नव्हते. त्यासाठी पोलिसांच्या तसेच प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्याचा अंत्यविधी पार पडला. तरुण ज्या बेटावद खुर्द गावचा रहिवासी आहे, तेथे मुस्लिम समाजाचे चारच घर असल्याने त्या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले
आहे. जामनेर शहरासह बेटावद खुर्द येथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या तरुणाच्या सामूहिक मारहाणीचे पडसाद संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उमटले असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात एका संघटनेतर्फे या तरुणाच्या सामूहिक मारहाणीचा निषेध व्यक्त करून आज रोजी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनाद्वारे अनेक मागण्यात करण्यात आल्या. एका संघटनेने निषेध व्यक्त करून संघटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करावी, ही त्यांची पहिली मागणी आहे. दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करावे, पीडितांच्या कुटुंबास तातडीने किमान 25 लाख रुपयांची मदत करावी, मानवाधिकार व अल्पसंख्यांक आयोगाच्या वतीने स्वतंत्रपणे लक्ष दिले जावे, गावात पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि मागण्या केल्या आहेत. जिल्हा एकता संघटनेने केलेल्या मागण्या रास्तच आहेत.
जामनेर तालुका अनेक प्रकारे महाराष्ट्रात गाजत असताना तरुणाच्या सामूहिक मारहाण प्रकरणाने त्यात भर पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असताना या तरुणाच्या सामूहिक मारहाणीचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे पोलिसांपुढे पुन्हा एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जळगाव जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. या घटनेला जातीय रंग देऊ नये, आणि तसा कोणी प्रयत्न केला तर पोलिसांनी त्याला वेळीच ठेचून काढावे. जिल्हाभरात या तरुणाच्या मृत्यूनंतर विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे पोलीस अधीक्षकांनी आव्हान केले आहे. अफवांना कोणीही बळी पडू नये. शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मारहाण करणाऱ्या गुंडांना जात धर्म नसतो. केवळ गुंडगिरी हेच त्यांचे ध्येय असते. हे प्रकरण आता पोलिसांनी योग्यरीत्या हाताळावे. निपक्षपातीपणे चौकशी करून जनतेचा विश्वास संपादन करावा. जिल्ह्यातील शांतता भंग होणार नाही याची काळजी पोलिसांबरोबरच जनतेने सुद्धा घेण्याची गरज आहे. पोलिसांनी मात्र गुंडगिरी करणाऱ्यांना वेळेत ठेचून काढणे हीच अपेक्षा...!

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने