जळगाव : जिल्ह्यातील पहूर-जामनेर रस्त्यावर
मालमोटारीने दुचाकीला धडक दिल्याने चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा पिंपळगाव गोलाईत गावाजवळ घडली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवींद्र सुनील लोंढे, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. २० ते २४ वयोगटातील चौघे तरूण जामनेर शहरातील जामनेरपुरा तसेच भीमनगर भागातील रहिवाशी आहेत. मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चौघे तरूण दुचाकीने जामनेरकडे येत होते. तर त्याच सुमारास सिल्लोड येथील व्यापारी जामनेरहून पहूरकडे मालमोटारीने जात होता. पिंपळगाव गोलाईत येथील घातक वळणावर मालमोटार आणि दुचाकींची जोरदार धडक झाली, त्यात चंद्रकांत, अंकुश, अजय आणि रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. मालमोटारीचा चालक जुबेर कुरेशी हा देखील गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहूरचे सरपंच अबू तडवी है देखील मदतीसाठी धावून आले. पोलिसांनी तरूणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात रवाना केले. त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.
टिप्पणी पोस्ट करा