मलकापूर : जाणबुळधाबा येथेजिल्हा परिषद शाळेजवळ झालेल्या दुचाकी अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


मलकापूर : जाणबुळधाबा येथे
जिल्हा परिषद शाळेजवळ झालेल्या दुचाकी अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मलकापूर 
जाणबुळधाबा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेजवळील मुख्य रस्ता ओलांडत असताना अचानक समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीने संबंधित व्यक्तीस जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ते जागेवरच गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत केली व जखमी व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख प्रमोद सुखदेव भंगाळे अशी करण्यात आली आहे.
घटनेनंतर अपघातस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

स्थानिक ग्रामस्थांनी अशा अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी शाळेजवळ वेगमर्यादा फलक व वेग नियंत्रक यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. शाळेच्या परिसरात विद्यार्थी व ग्रामस्थांची वर्दळ जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका कायम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये झाली.
अपघाताची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून दुचाकीस्वाराविरुद्ध आवश्यक ती कारवाई सुरू आहे. या अपघाताची अधिकृत नोंद २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून स्थानिक नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने