गरम पाण्याने गंभीर भाजलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यु


जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत गरम पाणी अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या चार वर्षीय चेतन जितेंद्र पाटील या चिमुकल्याचा बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

जितेंद्र पाटील हे एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीस असून त्यांचा मुलगा चेतन हा आठ दिवसांपूर्वी घरात खेळत असताना आईकडे पोहे खाण्याचा हट्ट धरत होता. त्याची आई स्वयंपाकाची तयारी करत असताना चेतन खेळत खेळत घरातील बाथरुममध्ये गेला. तेथे ठेवलेल्या बादलीतील उकळते गरम पाणी चुकून त्याच्यावर ओतले गेले आणि तो गंभीर भाजला.

कुटुंबीयांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु भाजलेल्या जखमांमुळे त्याची प्रकृती सतत बिघडत गेली. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चेतनची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. एसटी विभागातील आनंदा कौतीक सपकाळे आणि रविंद्र सोनवणे यांनी उपचारासाठी आर्थिक मदतही जमा केली होती; मात्र देवाने न्याय केला नाही.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने