मालवाहू वाहनातून लोखंडी अँगल रस्त्यावर, जिवीत हानी नाही !



मलकापूर :- शहरातील अतिवर्दळीच्या तहसील चौकात बुधवारी सायंकाळी मोठी दुर्घटना टळली. (एम.एच.२८ बी.बी.८३७८) क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून तब्बल चार क्विंटल वजनाच्या लोखंडी एंगल अचानक रस्त्यावर कोसळल्या. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने त्या क्षणी रस्त्यावर मोठी वाहतूक नव्हती. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेचा ताण नसल्याने विद्यार्थ्यांना ने-आण करणारी कोणतीही वाहने जवळपास नव्हती. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी न होता दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चौकात वाहतूक पोलिसांचा पूर्णपणे अभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील सर्वात महत्त्वाच्या चौकांतून सतत वाहतूक सुरु असताना,एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. या निष्काळजीपणामागील जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष घालतील का, अशी चर्चा शहरभर सुरू झाली आहे. एंगल रस्त्यावर विखुरल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, स्थानिकांच्या मदतीने रस्ता तातडीने मोकळा करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. वाढत्या वाहतुकीमुळे अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने