मलकापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर-धुळे मार्गावरील चालत्या एसटी बसमध्ये एका विवाहितेशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या ३२ वर्षीय युवकास मलकापूर बसस्थानकात संतप्त नागरिकांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास घडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच बसचालकाने बस थेट शहर पोलिस ठाण्यात वळवली. या घटनेमुळे सुमारे दोन तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच १४ एलएक्स-६३२६) खामगाव बसस्थानकात थांबली असता भुसावळ येथील एक विवाहिता बसमध्ये चढून वाहकाच्या शेजारी बसली. त्यानंतर खामगाव येथील एक युवक बसमध्ये चढला. वाहक तिकीट देण्यासाठी पुढे गेल्याची संधी साधत संबंधित युवकाने 'गरोदर पत्नीला फोन करायचा आहे; मात्र मोबाइलमध्ये बॅलन्स नाही,' असे सांगून विवाहितेकडून मोबाइल घेतला व मिस कॉल दिला. त्यानंतर तो विवाहितेशी वैयक्तिक चौकशी करू लागल्याचा आरोप आहे. नांदुरा येथून बस सुटल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच विवाहितेने खामगाव व मलकापूर येथील नातेवाइकांना माहिती दिली. त्यामुळे मलकापूर बसस्थानकात नागरिकांची मोठी गर्दी झाली. बस येताच संतप्त नागरिकांनी त्या युवकाला मारहाण केली. पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाची समजूत काढली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास माफीची प्रक्रिया झाल्यानंतर प्रकरण शांत झाले.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा