एटीएम मधून पैसे काढणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या ताब्यात, नांदुऱ्यात शिपायाच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार उघड; अनेक कार्ड जप्त !


नांदुरा अर्बन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून बेकायदेशीररित्या पैसे काढणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांना बँकेच्या शिपायाच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. हा प्रकार सोमवार, 12 जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आला.

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन अनोळखी तरुण नांदुरा अर्बन बँकेच्या एटीएममध्ये दाखल झाले. त्यांनी एटीएमशी छेडछाड करत दहा-दहा हजार रुपये असे सलग दोन वेळा मिळून एकूण 20 हजार रुपये काढले. संशयास्पद हालचाली लक्षात येताच एटीएमबाहेर कर्तव्यावर असलेले बँकेचे शिपाई नेमाडे यांनी सतर्कता दाखवत ही बाब तत्काळ बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्रप्रसाद पांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. पांडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांची चौकशी केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे असलेली आधारकार्ड बनावट असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपी कोणत्या टोळीचे सदस्य आहेत, यापूर्वी त्यांनी इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने