मलकापूर : शिवणी ते तळसवाडा जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल भाऊराव भवरे (वय ३५ वर्षे), असे मृत तरुणाचे नाव आहे. गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून मलकापू ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार अमोल भवरे हा ऑटो चालवून स्वतःचा व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. आज ८ जानेवारीच्या सकाळी तळसवाडा-शिवणी रोडच्या कडेला अमोलचा मृतदेह काही नागरिकांना संशयास्पद अवस्थेत पडलेला आढळून आला. नागरिकांनी तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.
मृतक अमोल भवरे याच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण काय?, खुनी कोण आहे?, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तपासचक्रे फिरवायला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृतक अमोलचे शेवटचे संपर्क, तसेच त्याचा कोणाशी वैयक्तिक किंवा व्यावसायिक वाद होता का?, या दिशेने तपास सुरू केला आहे. ऑटोचालक व स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा