मलकापूर : शहरातील नागरिकांना सर्पाच्या भीतीतून मुक्त करून सुरक्षित झोप मिळावी म्हणून अनेक वर्षे जीव धोक्यात घालून सेवा करणारे ज्येष्ठ सर्पमित्र नामदेव विश्वनाथ उज्जैनकार (रा. यशोधाम कॉलनी, मलकापूर) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, १३ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की गाडेगाव परिसरातील काही नागरिकांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराजवळ सर्प निघाल्याची माहिती सर्पमित्र नामदेव उज्जैनकार यांना दिली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असलेले उज्जैनकार यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सदर सर्प एका सुमारे दोन फूट खोल नालीमध्ये लपून बसला होता. परिस्थितीचा अंदाज घेत उज्जैनकार यांनी धाडसाने त्या नालीमध्ये उतरून सर्पाला सुरक्षितपणे पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चिमट्याच्या सहाय्याने सर्पाला पकडलेही; मात्र अचानक सर्पाने जोराचा झटका मारत चिमट्यातून सुटका करून घेतली आणि क्षणातच नामदेव उज्जैनकार यांच्या पायाला दंश केला. सर्प विषारी असल्याची जाणीव होताच त्यांनी वेळ न दवडता तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आणि काही काळ त्यांनी मृत्यूशी झुंजही दिली. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. उपचार सुरू असतानाच काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
नामदेव उज्जैनकार हे वयोवृद्ध असूनही अत्यंत धाडसी आणि सेवाभावी स्वभावाचे होते. रात्री असो वा दिवस, शहरातील कुठेही सर्प निघाल्याची माहिती मिळताच ते स्वतःचा जीव धोक्यात घालून घटनास्थळी पोहोचत असत. अनेक वर्षांपासून त्यांनी शेकडो सर्प पकडून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे काम केले होते. त्यांच्या या सेवेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आणि नागरिकांना भीतीमुक्त वातावरणात राहता आले.
कुटुंबांना दिलासा मिळाला आणि नागरिकांना भीतीमुक्त वातावरणात राहता आले.
लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या सर्पमित्राचा शेवट मात्र सर्पदंशानेच झाला, ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. "इतरांना शांत झोप मिळावी म्हणून धावणारा माणूस आज कायमचा निघून गेला," अशा शब्दांत अनेकांनी आपली भावना व्यक्त केली. या घटनेची माहिती समजताच मलकापूर परिसरात शोककळा पसरली असून विविध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी नामदेव उज्जैनकार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने शहराने एक धाडसी, सेवाभावी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारा माणूस गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा