धक्कादायक ! म्हणतात ना लग्न आणि विघ्न , ते खरे ठरले ! अनुराबाद येथील थरारक घटना !

मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील अनुराबाद
येथील निसर्गरम्य आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर परिसरात आज आनंदाचे वातावरण होते. सनई-चौघड्यांच्या सुरात वधू-वरांच्या अक्षता पडण्याची वेळ जवळ आली होती. सकाळी ११ वाजताच्या शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्नाचे विधी सुरू असतानाच अचानक हजारो मधमाश्यांच्या थव्याने वऱ्हाडी मंडळींवर भीषण हल्ला चढवला. या अनपेक्षित संकटामुळे मंगलमयी वातावरणाचे रूपांतर क्षणात भयावह युद्धभूमीत झाले. या हल्ल्यात दोन पाहुणे गंभीर जखमी झाले असून, अनेकांच्या अंगावर मधमाश्यांनी शेकडो दंश केल्याने खळबळ उडाली आहे.

अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी आज एका विवाह
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांकडील शेकडो पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने जमली होती.मंडपात अक्षतांचे वाटप सुरू होते, तर काही पाहुणे जेवणाच्या पंक्तीकडे वळले होते. ठीक ११ वाजता मंगलाष्टके सुरू होणार होती, मात्र त्यापूर्वीच
झाडावरील मधमाश्यांचे मोठे मोहोळ उठले. काही कळण्याच्या आतच काळभोर मधमाश्यांनी संपूर्ण लग्नमंडपाचा ताबा घेतला.

मधमाश्यांचा हल्ला इतका तीव्र होता की, मंडपात बसलेल्या महिला, लहान मुले आणि वृद्धांना पळण्याची संधीही मिळाली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच चित्कार आणि धावाधाव सुरू झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक पाहुण्यांनी अंगावरील भरजरी कपड्यांची पर्वा न करता जवळच्या शेतांच्या दिशेने धाव घेतली. काही अनुभवी वृद्धांनी ओरडून 'जमिनीवर झोपा' असे सुचवल्यानंतर, अनेकांनी जमिनीवर लोळण घेतली. काहींनी झाडांच्या आडोशाला तर काहींनी मंदिराच्या गाभाऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या मधमाश्यांनी कोणाचीच सुटका केली नाही. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

विस्कळीत झालेला विवाह सोहळा दुपारी उशिरा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. मात्र, या घटनेने लग्नसोहळ्यातील आनंदावर भीतीचे सावट कायम होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने