*नांदुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्ञानाचा जागर; आदिवासी विद्यार्थ्याला १० हजारांची मदत!*
नांदुरा :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचा आदर्श 'सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट'ने घालून दिला आहे. यंदाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षणासाठी भरीव मदत आणि ग्रंथवाटप करून एक वेगळाच 'नांदुरा पॅटर्न' पाहायला मिळाला.
आदिवासी विद्यार्थ्याच्या जिद्दीचा गौरव कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे आदिवासी विद्यार्थी राज सुनील चव्हाण याचा सत्कार. राजची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल त्याचे कौतुक केवळ पुष्पगुच्छापुरते मर्यादित न ठेवता, ट्रस्टतर्फे त्याला पुढील शिक्षणासाठी १० हजार रुपयांचा धनादेश आणि बाबासाहेबांचे ग्रंथ भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले. एका गुणवंत विद्यार्थ्याच्या पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप उपस्थितांची मने जिंकून गेली.
महिलांना 'ग्रंथ' भेट अन् पत्रकारांचा सन्मान
डॉ. बाबासाहेबांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र दिला होता. याच विचाराने प्रेरीत होऊन शेकडो महिलांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील मूल्यांची आठवण करून देण्यासाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ खंड २० – पत्रकारिता' हा विशेष ग्रंथ भेट देण्यात आला. कडाक्याच्या उन्हात नागरिकांची सोय व्हावी म्हणून पाणी वाटपाचा उपक्रमही राबवण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रेरणादायी सोहळ्याला ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोषराव तायडे (लोणवाडीकर), प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष गोविंद वाघ,सुखदेव ब्राम्हणे,सोयस्कर सर,दिनकर वाकोडे, राजेश इंगळे, किशोर इंगळे, तोताराम वाकोडे, काशीराम सरदार, सुनील चव्हाण, प्रभाकर इंगळे, भीमराव कळसकार, मुकेश तायडे, अमोल तायडे,विजय तायडे,नितीन तायडे, सोनटक्के सर, हिवराळे सर, प्रशांत इंगळे व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"केवळ हार-तुरे न घालता, शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करणे हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे," अशा शब्दांत आयोजकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा