मलकापूर :- विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरात पुन्हा एकदा सट्टामटका, गुटखा आणि संशयास्पद व्यवहारांच्या अंडरवर्ल्डमधील धक्कादायक घडामोडींनी शहरात खळबळ उडवून दिली आहे. सुप्रसिद्ध सट्टामटका किंगच्या पुतण्याला नाशिकमध्ये भरचौकात झालेल्या जबर मारहाणीची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली असून, या घटनेने अनेक गुपितांवरचा पडदा उघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत…!
मिळालेल्या माहितीनुसार, कपडा व्यवसायाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून सट्टामटका, गुटखा पुरवठा, आर्थिक व्यवहार आणि विविध गूढ नेटवर्क चालवणाऱ्या या बहुचर्चित व्यापारी कुटुंबाचा काळा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील सामान्यांपासून ते व्यावसायिक वर्तुळात या कथित किंगच्या जुन्या कारनाम्यांच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.
एकेकाळी विमल गुटखा नेटवर्कपासून सुरू झालेला हा प्रवास नंतर सट्टा व्यवहार, बेकायदेशीर आकड्यांचे जाळे आणि राजकीय-सामाजिक संपर्कांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन मलकापूर पोलिस निरीक्षकांच्या कारवाईचा फटका बसलेला हा गुटखा सम्राट आजही विविध माध्यमातून सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नाशिकमधील कथित भोंदू बाबा, धार्मिकतेच्या आवरणाखालील आर्थिक देवाणघेवाण, तसेच सट्टा आकड्यांच्या माध्यमातून विस्तारलेले व्यवहार यामुळे या प्रकरणाला आणखी गूढ वळण मिळाले आहे.
आजच्या ताज्या घडामोडीत, संबंधित किंगने स्वतःच्या पुतण्याला ‘परफेक्ट आकडा’ देत नाशिक येथे व्यवहारासाठी पाठविले. मात्र सट्टा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला संशय आल्याने पुतण्याला भरचौकात जबर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, आकडा नेमका कोणाकडून आला याची कबुलीही त्याच्याकडून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे मलकापूरसह संपूर्ण विदर्भातील सट्टा विश्वात एकच खळबळ उडाली असून, या बहुचर्चित ‘संतुष्ट हस्ती’ची खरी ओळख, त्याचे राजकीय-सामाजिक पाठबळ आणि आर्थिक साम्राज्य यावर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील नागरिकांमध्ये आता एकच प्रश्न चर्चिला जात आहे — पोलिस प्रशासन आणि संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणणार का…? की पुन्हा एकदा पैशांच्या आणि प्रभावाच्या जोरावर हे प्रकरण दाबले जाणार…?
मलकापूरमध्ये सध्या या प्रकरणाची खमंग, तिखट आणि गूढ चर्चा जोरात सुरू असून, पुढील काही दिवसांत अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे…!
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा