वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच मजूर ठार ,जालना जिल्ह्यात भीषण दुर्घटना; बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा समावेश


बुलडाणा : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर रात्री उशिरा टिप्परमधून ओतलेल्या वाळूखाली दबून पाच मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.

मृतांमध्ये बुलडाणा तालुक्यातील दहीद खुर्द येथील राजेंद्र वाघ यांचादेखील समावेश आहे. मृतक हे सिल्लोड, बुलडाणा व जामनेर तालुक्यातील असून, एकमेकांचे नातेवाईक होते. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने शुक्रवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू रिचवल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी

शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे मजूर झोपले होते. रात्री साडेतीन वाजेदरम्यान आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर टाकल्याने शेडमध्ये झोपलेले सहाजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. समोरच्या भागात झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. यामुळे टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता, त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक १२ वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, इतर पाच जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय ५०, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), भूषण गणेश धनवई (वय १७, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय ४०, रा. दहिद, ता. बुलडाणा), सुनील समाधान सपकाळ (वय २०, रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना), सुपडू आहेर (वय ३८, रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी मृतकांची नावे आहेत. मृतक एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत. रवींद्र आनंद या ठेकदाराचे हे काम सुरू आहे. या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच जाफ्राबादचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थांनी पंचनामा न करता मृतदेह ताब्यात घेऊ नये, असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने