बुलडाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी रात्री देऊळगावमही येथे मुंबई एटीएसने अटक केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी मुंबई येथील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला ईमेलद्वारे प्राप्त झाली होती. यानंतर लगेच मुंबई पोलीस व एटीएस पथक सतर्क झाले. गुरुवारी रात्री गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर व देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे व मुंबई एटीएस पथक देऊळगावमही येथे धडकले.
या दरम्यान धमकीच्या ई-मेल आयडी अॅड्रेसवरून अभय शिंगणे (वय २५) व मंगेश वायाळ (दोघे रा. देऊळगावमही) यांना ताब्यात घेतले. त्यांना एटीएसच्या पथकाने अटक करून मुंबई येथे घेऊन गेले.
एटीएस पथकाने अटक केलेल्या अभय शिंगणे याचे देऊळगावमही येथे मुख्य रस्त्यावर मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक आहे. ई-मेल द्वारे धमकी देणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी तपासल्यानंतरच धमकी देण्याचे कारण उघडकीस येणार आहे. अटक करण्यात आलेले
आरोपी मामेभाऊ आतेभाऊ आहे. मंगेश वायाळ याने अभयच्या मोबाईल शॉपीत मोबाईल चार्जिंगला लावला होता तेथूनच धमकीचे ई-मेल पाठविण्यात आले. मंगेश वायाळ हा अल्पशिक्षित तर अभय शिंगणे हा बारावी उत्तीर्ण आहे.
* गुन्हा दाखल
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३५१ (३), ३५१ (४) आणि ३५३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कलमांनुसार, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यास किंवा महत्त्वाच्या व्यक्तीला धमकी देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.
* सखोल चौकशी करा माजी आमदार खेडेकर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर महाराष्ट्राची विकासाची गती वाढली. जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना
राबविल्या त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुःखत आहे. त्यामुळे अनेकजण नेहमी एकनाथ शिंदे यांना पाण्यात पाहतात. धमकी मिळाली या मागील मास्टरमाईंड कोण आहे याचाही पोलिसांनी शोध घेऊन खऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.
मेल पाठवण्यावरून मतभेद
आतेभाऊ मामेभाऊ असे नाते असलेले मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडविण्याचा मेल हा मंगेश उर्फ मदन वायाळ यांच्या मोबाईलवरून गेला आहे. त्याच्या मोबाईल वरून जाणारा हा पहिलाच मेल आहे, त्यामुळे सदर मेल हा आपण पाठवला नसल्याचे आपल्या कुटुंबाला सांगितले आहे. त्यामुळे दोघांनीही एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा काम केले. मात्र, आता पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा