एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ लागू !

नागपूर : एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये येत्या २५ जानेवारीपासून म्हणजे २४ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजतापासून १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. नागपूर येथून चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ येथे जाणाऱ्या बसेसच्या भाड्यात ३७ रुपये वाढ झाली असल्यामुळे आता प्रवाशांना २६२ रुपये मोजावे लागतील. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या एसटीच्या तिकीटदरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडेवाढीला १४.९५ टक्के मंजुरी देण्यात आली आहे. २४ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजतापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच महागाईभत्त्यात वाढ झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या लालपरी, शिवशाही, शिवनेरी, निमआराम, शयन आसनी, ई-बस ९ व १२ मीटर आदी सर्वच प्रकारच्या बसेसमध्ये ही भाडेवाढ लागू राहणार आहे. यापूर्वी चंद्रपूर, अमरावती,यवतमाळ येथे साध्या बसने जाण्यासाठी २२५ रुपये भाडे होते; परंतु भाडेवाढ झाल्यामुळे यात ३७ रुपये वृद्धी झाली असून आता २६२ रुपये मोजावे लागतील. नागपूर-चंद्रपूर १२ मीटरच्या ई-शिवाई बसची तिकीट ३६० रुपये होती. आता प्रवाशांना ५४ रुपये तर शिवशाहीने पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांना २५५ रुपये आणि छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी १८० रुपये अधिक मोजावे लागतील.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने