जळगाव, पीपल्स टाईम्स न्यूज
ता. यावल सावखेडासिम येथून चोपड्याकडे ऊस नेणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला. ही दुर्घटना वाघोदा गावाजवळ मंगळवारी मध्यरात्री घडली. या अपघातात ३२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षीय क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात राकेश जयराम बारेला (वय ३२, रा. छोटी शिरवेल, ता. सेंधवा, जि. बडवाणी) या चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर राधेश्याम गंभीर बारेला (वय २०, रा. बोरअजंटी, ता. चोपडा) हा गंभीर जखमी झाला.
एमएच-१९-सीव्ही-११२४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून ऊस वाहतूक सुरू होती. चालक राकेश बारेला आणि क्लिनर राधेश्याम बारेला हे दोघे चोपड्याकडे जात असताना वाघोदा गावाजवळील नदीच्या पुलावर मध्यरात्री हा अपघात झाला. अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने संपूर्ण ट्रॅक्टरसह ट्रॉल्या पुलावरून थेट नदीत कोसळल्या.
या भीषण अपघातात चालक राकेश बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी क्लिनर राधेश्याम बारेला याला तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जळगाव येथे हलवण्यात आले. या अपघातानंतर यावल पोलिस ठाण्यात दिनकर महाजन यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राकेश बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा