जळगांव- पिंप्राळा हुडको परिसरात गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला, यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही या झटापटीत तुटून हरवले.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर काही संशयित अजून फरार आहेत. याच संशयितांना पकडण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक पिंप्राळा हुडको परिसरात गेले होते.
पोलिसांचे पथक पिंप्राळा हुडकोत पोहोचताच जमावाने त्यांना घेरले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली.
जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून महिला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव अधिकच हिंसक झाला. जमावाने महिला पोलिसांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि मारहाण केली.
या झटापटीत स्वाती पाटील नावाच्या महिला पोलिसांच्या गळ्यातील मंगळसूत्र
तुटून हरवले, तर शिला गांगुर्डे या महिला पोलिसांना जमावातील एका व्यक्तीने कडाडून चावा घेतला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दोन्ही जखमी महिला पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा