सोन्याच्या खजिन्याचे आमिष ; आणि २५ लाखाचा गंडा !


धामणगाव बढे : - बांधकामाच्या ठिकाणी सापडलेले सोनं स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तिघांना तब्बल २५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी सहा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आनंदा नारायण जंजाळ (वय ४८, रा. भराडी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना थळ परिसरात बांधकाम सुरू असलेल्या जागेत खजिना सापडल्याचे सांगून, कमी किमतीत एक किलो सोनं देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करत त्यांनी २५ लाख रुपयांत व्यवहार ठरवला.

२२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर आरोपींनी बनावट पोलिसांची नाटकी सादर केली. काहीजण नकली पोलिसांच्या वेशात आले आणि सोने असलेली गाडी पकडल्याचा बनाव केला. यादरम्यान, त्यांनी सोनं न देता २५ लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जंजाळ यांनी तातडीने धामणगाव बढे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांखाली सहा अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने