निंभोरा बु.: निंभोरा गावाजवळील
मोठा वाघोदा रोडलगत असलेल्या शेतातील विहिरीतून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह काढताना एक अज्ञात मानवी सांगाडा आढळून आल्याची खळबळजनक घटना १४ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निंभोरा येथील देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७) या तरुणाने गावातील उज्वल नरेंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फौजदार अभय ढाकणे, पो.हे.का. अविनाश पाटील व किरण जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने देवेंद्र याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
मात्र, मृतदेह काढत असतानाच विहिरीतून अज्ञात व्यक्तीचा सांगाडा सापडला. सांगाडा कमरेपासून मांडीपर्यंतचा भाग असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून सांगाडा डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. सांगाड्याचा पंचनामा करून तो भातखेडा शिवारात अंत्यसंस्कारपूर्वक पुरण्यात आला.
या घटनेनंतर पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे, जेणेकरून अज्ञात सांगाड्याची ओळख पटवता येईल. याप्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे व त्यांच्या टीमकडून सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा