मलकापूर : मलकापूरः महा ई-सेवा केंद्रांकडून सर्वसामान्य जनतेची होणारी लुट तात्काळ थांबविण्यात यावी व चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या महा ई-सेवा केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २४ एप्रिल रोजी तहसीलदार मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सर्वसामान्य जनतेची कामे ही सुलभ व तातडीने व्हावी याकरीता महा ई-सेवा केंद्र शासनाच्या माध्यमातून चालविण्यासाठी देण्यात आलेले आहेत. सदरची महा ई-सेवा केंद्र ही तालुक्याच्या ठिकाणी तसेच तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्यांची शासकीय स्तरावरील कामे ही जलद व गावातच व्हावी हा उदात्त हेतू शासनाचा आहे. परंतु अनेक ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी आपले आयडी हे शहरी भागातील म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या काहींना महा ई-सेवा केंद्र चालविण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे एकप्रकारे ही शासनाच्या डोळ्यात धुळफेक असून शासनाचा उद्देशही धुळीस मिळविण्याचा प्रकार आहे. तर यामुळे ग्रामीण भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागत आहेत. तसेच सर्वच महा ई-सेवाल केंद्रावर लागणाऱ्या दाखल्यांसाठी ठरवून देण्यात आलेले दरपत्रकच लावण्यात येत नसल्याने केंद्रचालक नागरिकांकडून मनमानी पैसे घेवून त्यांची आर्थिक लुट करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिकही फटका सहन करावा लागत आहे. तरी सर्व महा ई-सेवा केंद्रावर ठळकपणे लागणाऱ्या दाखल्यांचे दरपत्रक व कालावधी प्रसिध्द करणे बंधनकारक करावे. महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या कामांना प्राधान्य देणे हा शासनाचा उद्देश असून या उद्देशालाच एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम होत असतांनाही प्रशासन मात्र याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा अशा महा ई-सेवा केंद्राची तात्काळ चौकशी करण्यात यावी व ग्रामीण भागातील महा ई-सेवा केंद्रे जी त्यांच्या गावात सुरू नाहीत त्यांचे आयडी तात्काळ रद्द करावे व त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच शहरी भागात आपले महा ई-सेवा केंद्राचे आयडी दिले असतील अशांवर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकरणी प्रशासनाच्या वतीने येत्या ७ दिवसात ठोस अशी कारवाई न केल्यास प्रहार स्टाईलने जनआंदोलन उभारण्यात येईल, आणि याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा