मलकापूर तालुक्यात पुन्हा थरार ! धोंगर्डी पुलाजवळ युवकावर कोयत्याने हल्ला; आरोपी फरार – पोलिसांचा तपास सुरू !


मलकापूर  : मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी पुलाजवळ शनिवारी (दि. १) सायंकाळी झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात एका २८ वर्षीय युवकाला गंभीर दुखापत झाली असून, या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोडगा येथील प्रतीक दिलीप मोरे (वय २८) हा युवक आपल्या कामानिमित्त धोंगर्डी फाट्याजवळ गेला असताना त्याचा हरसोडा येथील ज्ञानेश्वर मुरलीधर झाल्टे (वय ३२) याच्याशी काही कारणावरून वाद झाला. वाद तीव्र होऊन ज्ञानेश्वर झाल्टे याने संतापाच्या भरात प्रतीक मोरे याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात प्रतीक मोरे याच्या मान, कान व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून, तो घटनास्थळीच कोसळला. तत्काळ स्थानिक नागरिकांनी जखमीला उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर झाल्टे हा प्रतीक मोरेची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. स्थानिक परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने