मलकापूर :- धुळे तालुक्यातील चांदे शिवारात उघडकीस आलेल्या नकली नोटा प्रकरणात धुळे पोलिसांनी मलकापूर येथील धान्य व्यापारी अमित चवरे यास अटक केली आहे. धुळे पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथे येऊन शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मदतीने चवरे यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला धुळे न्यायालयात हजर करण्यात आले असता सुरुवातीला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चांदे शिवारात नकली नोटा आढळल्याच्या घटनेनंतर धुळे पोलिसांनी मलकापूर तालुक्यातील मौजे हिंगणाकाझी येथील मोहम्मद जफर मोहम्मद कुद्दूस (वय ३०) यास ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने दिलेल्या कबुलीत सांगितले की, "चवरे ट्रेडर्स"चे मालक अमित चवरे यांनी मोठ्या धान्य व्यवहारामध्ये बनावट रोकड पुरवली होती. या खुलाशाच्या आधारे पोलिसांनी चवरेला मलकापूर येथून अटक केली. धुळे पोलिसांनी या प्रकरणाची तपासाची व्याप्ती वाढवली असून, नकली नोटा पुरवठा साखळीचा संबंध बुलढाणा, मलकापूर आणि मालेगावपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मालेगाव येथील अशाच स्वरूपाच्या नकली नोटा प्रकरणाशी या घटनेचा संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. मलकापूर तालुक्यातील दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे या नकली नोटा रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिला .
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा