'स्कुल ऑफ स्कॉलर' चा गॅदरिंगच्या नावाखाली बेकायदेशीर रस्ता वळवणुकीचा प्रताप ! पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड !

मलकापूर : मलकापूर शहरात दुपारपासून थेट रात्रीपर्यंत 'स्कुल ऑफ स्कॉलर'च्या गॅदरिंगच्या नावाखाली नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे कोणतेही लेखी आदेश नसताना, स्कुल ऑफ स्कॉलरचे आयकार्ड गळ्यात घालून पोलिसी बॅरिगेट्स उभारण्यात आले आणि शहरातील मुख्य रस्ता बिनधास्तपणे वळवण्यात आला. या मनमानी निर्णयामुळे नागरिकांना बेलाड फाट्यावरून तब्बल ३ ते ४ किलोमीटरचा फेरा मारावा लागला.

दुपारपासून सायंकाळपर्यंत जवळपास ४ ते ५ तास हा त्रास सुरूच राहिल्याने शहरभर संतापाची लाट उसळली. या काळात रुग्णवाहिका, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक, नोकरदार, व्यापारी, महिला तसेच वृद्ध नागरिक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अडवण्यात आले. “रस्ता कुणाच्या आदेशाने बंद केला?" असा प्रश्न उपस्थित केला असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर खासगी कार्यक्रमासाठी पोलिसी थाटात बॅरिगेट्स लावणे म्हणजे नियमांची सरळसरळ पायमल्ली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाची अधिकृत परवानगी नसताना असा प्रकार घडतोच कसा, तसेच वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांची गैरसोय, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास वाढत असताना प्रशासनाकडून तत्काळ दखल न घेतल्याने संताप अधिकच तीव्र झाला आहे. सार्वजनिक रस्ते हे कुणाच्या खासगी मालकीचे नसून सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरासाठी आहेत. त्यामुळे संबंधित संस्था, कार्यक्रम आयोजक आणि परवानगी देणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मलकापूरकरांकडून होत आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने