"पूर्णाकृती पुतळा व स्मारका मागील जागा समाज उपयोगासाठी मिळावी" मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचा २९ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा**


मलकापूर :- मलकापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती करण्यात यावा तसेच स्मारकाच्या मागील जागा समाजाच्या उपयोगासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलकापूर रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात गेल्या सुमारे ५० वर्षांपासून अर्धाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. दीर्घ काळ लोटल्यामुळे पुतळ्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून काही ठिकाणी त्याची खराबीही दिसून येत आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने तसेच आंबेडकर अनुयायांच्या भावना लक्षात घेता हा पुतळा पूर्णाकृती करण्यात यावा, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनांद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, स्मारकाच्या मागील जागेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर जागा समाजाच्या उपयोगासाठी अत्यंत आवश्यक असून, मलकापूर तालुक्यात इतर अनेक समाजांचे विवाह सभागृह उपलब्ध आहेत; मात्र बौद्ध समाजासाठी स्वतंत्र लग्न हॉल, युवकांसाठी वाचनालय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या ही जागा दुर्लक्षित अवस्थेत असून घाणीच्या विळख्यात सापडली आहे. या ठिकाणी अनैतिक प्रकार घडत असल्याचेही निदर्शनास आले असून, यापूर्वी भांडणे व गंभीर स्वरूपाच्या घटनाही घडल्या आहेत.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून दि. १० डिसेंबर २०२५ रोजी मलकापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी, शहर पोलीस स्टेशन तसेच नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले. दि. २८ डिसेंबरपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास दि. २९ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन बुलढाणा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मलकापूर तालुका अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार असून, यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष अजय प्रभाकर सावळे, महासचिव भीमराव नितुने, शहराध्यक्ष संजय वानखेडे यांच्यासह नगरपरिषदेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने