मलकापूर : - शहरातील चारखांब चौक परिसरात बुधवारी दुपारी भंगार व्यवसाय करणाऱ्या दोन गटांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेतले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव व मलकापूर येथील दोन भंगार विक्रेत्यांमध्ये काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून तणाव निर्माण झाला होता. आज दुपारी चारखांब चौकात दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर सुरुवातीला जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर एका गटातील व्यक्तीने धारदार शस्त्र काढून समोरच्या व्यक्तींवर हल्ला केला.
या हल्ल्यात दोन्ही बाजूंचे प्रत्येकी एक असे दोन जण गंभीर जखमी झाले. चाकूचे वार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
भरदिवसा घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा