मोताळा : - तालुक्यातील कोथळी गावाजवळील पश्चिम बीट परिसरात बिबट्याने निलगायची शिकार केल्याची घटना ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडली. प्रकाश सरोदे यांच्या शेतालगत असलेल्या वानखडे यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली असून, गव्हाच्या पिकात निलगायचे अवशेष आढळून आले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रब्बी हंगाम सुरू असल्याने बहुतांश शेतकरी रात्री उशिरापर्यंत शेतात पाणी देण्यासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर आढळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच मोताळा वन विभागाचे राऊंड ऑफिसर पी. एस. साडोक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतात बिबट्याचे पंजाचे ठसे आढळून आले असून, निलगायचे मृत अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी मोताळा येथे पाठवण्यात आले. या वेळी कोथळी-बीडचे वनरक्षक बाळासाहेब घुगे, चालक वैभव फुंडे, आबिद खान, मन्नान खान, आशिष ससाने, शेख शोएब, शेख इनुस शेख अफसर, पत्रकार इम्रान शाह हुसेन शाह तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. वन विभागाने शेतकऱ्यांना रात्री एकटे शेतात न जाणे, टॉर्चचा वापर करणे, समूहाने जाणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मागील काही महिन्यांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने वन विभागाकडून सतत निरीक्षण सुरू असून गरज भासल्यास पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा