धक्कादायक ! तुरीच्या गंजीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू; धक्क्याने आईनेही सोडले प्राण !

मलकापूर : तालुक्यातील हरणखेड परिसरात तुरीच्या गंजीला लागलेल्या आगीत सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या धक्क्याने आईनेही प्राण सोडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास शेतातील तुरीच्या गंजीला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. याच दरम्यान जवळ खेळत असलेला सात वर्षीय ओम होळे हा आगीत सापडला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण शॉर्टसर्किट किंवा उघड्या ज्वाळेमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई वनिता होळे (वय ३४) यांना तीव्र धक्का बसला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचेही निधन झाले. आई व मुलावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे हरणखेड परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने