मलकापूर :- विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहतूक पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत नियुक्तीच्या स्थळी न थांबता इतरत्र जात असल्याने अशा कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २५ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक शहर पो.स्टे. मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर शहरात वाहतुक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. शहरातून तहसील चौक मधून बुलढाणा, मुक्ताईनगर, नांदुरा जाण्यासाठी मार्ग आहे. परंतु या चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच झाला असल्याने वाहन धारक, पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तहसील चौकाप्रमाणेच शहरातील हनुमान चौक, टी पॉईंट, बस स्थानक चौक या परिसरातही वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतांनाही वाहतूक पोलीस आपली ड्युटी करण्याकडे दुर्लक्ष करीत वाहतूक कोंडी अधिकच होतांना दिसते. तहसील चौकामध्ये वाहतूक पोलीस मोहन करांगळे (बक्कल नं.२३७४) यांची ड्युटी असतांनाही ते आपल्या ड्युटीच्या ठिकाणी हजर न राहता महामार्गावर जावून कोणती ड्युटी बजावतात? कोणाच्या आदेशाने जातात? याचीच चर्चा होत आहे.
आज मी स्वत: माझी गाडी घेवून तहसील चौक परिसरात उभा असतांना वाहतूक पोलीस मोहन करांगळे यांनी त्याठिकाणी येवून माझ्याकडून गाडी चलानच्या नावाखाली १ हजार रूपये घेतले. त्याबाबतची चलान पावती मला देण्यात आली नाही. ते अशाचप्रकारे इतरही वाहन धारकांकडून पैसे घेवून त्यांना चलान पावती देत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.
तेव्हा अशा प्रकारे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणार्या व नागरिकांना व वाहन धारकांना नाहक त्रास देणार्या वाहतूक पोलीस कर्मचारी मोहन करांगळे यांचेवर तात्काळ कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच शहरातील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा २७ एप्रिल पासून पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही अजय टप यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा